भिकवडीला टेंभूचे पाणी मिळू शकते
सध्या लाभक्षेत्राबाहेर असलेल्या भिकवडी (ता.खानापूर) आणि परिसराला टेंभूचे पाणी मिळण्यासाठी माहूली टप्पा क्र.3 अ मधून पाणी देता येवू शकते, असे अभ्यासांती मत खानापूर तालुका टेंभू योजना कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथक यांनी व्यक्त केले आहे.
टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यातून अनेक गावे लाभक्षेत्रा च्या बाहेर राहिली आहेत. या गावांना टेंभू पाणी कसे देता येईल, याबाबत सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, शासनाचे आधिकारी आणि विविध स्तरांवर चर्चा, माहिती आणि अभ्यास अशा पातळ्यांव्दारे तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. त्यात खानापूर तालुका कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथक आपल्या परीने योगदान देत विविध पर्याय सुचवित आहेत. सध्याच्या नियोजनानुसार टेंभूचे पाणी भिकवडी या गावाला मिळत नाही.त्यावर उपाय म्हणून दोन प्रकारे पर्याय सुचवण्यात आले आहेत.
टेंभू योजनेच्या माहूली पंपगृहाच्या बरोब्बर ईशान्य दिशेला भिकवडी हे गाव आहे. या गावाचा आणि परिसराचा तब्बल 1 हजार 457 .86 हेक्टर म्हणजे 3 हजार 600 एकर इतका भाग या योजनेपासून वंचित राहिलेला आहे. या भागाला टेंभूचे पाणी मिळण्या साठी नेमके काय करता येईल? याबाबत खानापूर तालुका टेंभू योजना कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथकाने जी.पी.एस. यंत्र आणि टोपोशिटस् घेवून प्रत्यक्ष त्या भागात फि रून पाहणी केली. यांत कृती समितीचे अध्यक्ष अॅड.बाबासाहेब मुळीक, जिल्हा परिषद सदस्य किसनराव जानकर, बारमाही पथकाचे कार्याध्यक्ष, निवृत्त अभियंता डी.डी.पवार आणि संभाजी मोरे यांचा समावेश होता.
त्यांनी मांडलेल्या पर्यायानुसार माहूली पंपगृहातून पाणी उचलून टप्पा क्रमांक 3 अ चा घाणंद एक्स्प्रेस कालवा जिथे सुरू होतोे तिथून भिकवडी गावच्या पूर्वेला असणार्या पळस पाझर तलावात नैसर्गिक उताराने पाणी जावू शकते. माहूली पंपागृहाच्या पुढे वलखड गावाजवळ घाणंद कालवा सुरू होतो तिथे कालव्याची समुद्र सपाटी पासूनची उंची 740 मीटर इतकी आहे तर पळस पाझर तलावाची उंची 735 मीटर आहे. हे अंतर जास्तीत जास्त 5 ते 6 किलोमीटर इतके आहे. त्यामुळे या कालव्याच्या तोंडालाच विमोचक (गेट) करून बंदिस्त पाईपलाईन व्दारे अगर उघड्या कालव्यातून पाणी भिकवडी हद्दीतील तलावात तब्बल 5 मीटर उताराने आरामात जावू शकते.
तसेच त्या ठिकाणी इतका मोठा उतार येत असल्याने बंद पाईप लाईन अगर कालवा जादा खोल (डिप कट) करण्याचीही गरज नाही. शिवाय जिथून हा कालवा अगर बंद पाईप जाणार आहे ती सर्व जागा वनविभागाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची आहे, त्यामुळे भू संपादन करणे, नुकसान भरपाई देणे वगैरे गोष्टींचा संबंधही उरत नाही. परिणामी भिकवडी गावच्या माथ्यावर असलेल्या पळस पाझर तलावात पाणी आल्यानंतर त्या खालील पळस ओढ्यातून पुढे पाणी संपूर्ण गाव आणि परिसराला जावू शकेल.
यांत आणखी एक पर्याय सुचविण्यात येत आहे, जर उघडा कालवा अगर बंद पाईप यांचे अंतर कमी करायचे असेल तर वलखड हद्दीच्या पुढे याच घाणंद कालव्याच्या किलोमीटर क्रमांक 2 ते 3 या दरम्यानच्या वळण असलेल्या ठिकाणी एक विमोचक करून पाणी पुढे पळस ओढ्यात सोडता येवू शकते. हे पाणीही नैसर्गिक उताराने जावू शकते. घाणंद कालवा ते पळस ओढा हे अंतर केवळ एक ते दीड किलोमीटर इतकेच आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यायाबाबत शासनाच्या अधिकार्यांनी तातडीने सर्व्हेक्षण करून सकारात्मक विचार केल्यास आज पर्यंत लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेले भिकवडी हे गाव टेंभूच्या कार्यक्षेत्रात येवू शकेल.
No comments:
Post a Comment