घाणंद कालवा ढासळू लागला
टेंभू योजनेचा 70 ते 80 फूट खोलीचा माहुली ते घाणंद एक्स्प्रेस कालवा दिवसेंदिवस ढासळत आहे. हा कालवा 15 वर्षांपूर्वी खोदला आहे. आता अस्तरीकरणावरच्या बाजूला तातडीने गनायटिंग करून घेतले पाहिजे, अन्यथा पुढच्या दोन वर्षात कालवा ढासळण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे.
टेंभू योजनेमध्ये खानापूर तालुक्यातून आटपाडी तालुक्याकडे पाणी वाहून नेण्यासाठी माहुली पंपगृहातून घाणंद तलावाकडे हा एक्स्प्रेस कालवा आहे. हा उघडा कालवा असून त्याची खोली 70 ते 80 फुटाहून अधिक आहे. दावल मलिकच्या डोंगर रांगाच्या दक्षिणेला वेजेगाव, देविखिंडी, भिकवडी गावच्या हद्दीतून पुढे हा कालवा देविखिंडी बोगद्यातून पुढे घरनिकी गावच्या शीवेवर खाली उतरतो. एकूण 19 किलोमीटर अंतराच्या या कालव्याला 8 किलोमीटर बोगदा आहे. माहुलीपासून निघाल्यानंतर देविखिंडी बोगद्यापर्यंत येईपयर्ंत शासनाच्या नियमानुसार प्रत्येक 2.5 किलोमीटरला 1 मीटर डहाळ (म्हणजेच सरकारी भाषेत 2500 मीटरला 1 मीटर प्रमाणे उतार) देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात 1 किलोमीटरला 1 मीटर इतका तीव्र उतार देण्यात आला आहे.
परिणामी कालवा इतका खोल आहे की, योजनेच्या एकूण रकमेपैकी एक चतुर्थांश इतकी प्रचंड मोठी रक्कम खर्ची केवळ खोलीकरण आणि अस्तरीकरण म्हणजेच लाईनिंग या कामांसाठी पडली आहे. शिवाय आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावाच्या परिसरात आणखी किमान 4 मीटरवरच्या परिघाला पाणी देता आले असते. परंतु त्याचा विचारच योजनेचा आराखडा करताना केला गेलेला नाही. वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने यांची दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांंकडून होत आहे.
तातडीने उपाय गरजेचे
सध्या कालव्यावरील दरड कोसळून आत पडत आहे. ऊन, वारा , पाऊस यामुळे एकसंघ असणारे दगड दिवसेंदिवस सुटे होत आहेत. याबाबत कालव्याच्या अस्तरीकरणाच्या वर तातडीने गनायटींग म्हणजेच सिमेंट आणि वाळूचा प्रेशर देऊन गिलावा न केल्यास येत्या एक दोन वर्षातच कालव्यावरचा भाग ढासळून आत पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील कालव्याचे नुकसान होणार आहे .
No comments:
Post a Comment