लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Sunday, 10 July 2016

घाणंद कालवा ढासळू लागला

घाणंद कालवा ढासळू लागला
टेंभू योजनेचा 70 ते 80 फूट खोलीचा माहुली ते घाणंद एक्स्प्रेस कालवा दिवसेंदिवस ढासळत आहे. हा कालवा 15 वर्षांपूर्वी खोदला आहे. आता अस्तरीकरणावरच्या बाजूला तातडीने गनायटिंग करून घेतले पाहिजे, अन्यथा पुढच्या दोन वर्षात कालवा ढासळण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे.
टेंभू योजनेमध्ये खानापूर तालुक्यातून आटपाडी तालुक्याकडे पाणी वाहून नेण्यासाठी माहुली पंपगृहातून घाणंद तलावाकडे हा एक्स्प्रेस कालवा आहे. हा उघडा कालवा असून त्याची खोली 70 ते 80 फुटाहून अधिक आहे. दावल मलिकच्या डोंगर रांगाच्या दक्षिणेला वेजेगाव, देविखिंडी, भिकवडी गावच्या हद्दीतून पुढे हा कालवा देविखिंडी बोगद्यातून पुढे घरनिकी गावच्या शीवेवर खाली उतरतो. एकूण 19 किलोमीटर अंतराच्या या कालव्याला 8 किलोमीटर बोगदा आहे. माहुलीपासून निघाल्यानंतर देविखिंडी बोगद्यापर्यंत येईपयर्ंत शासनाच्या नियमानुसार प्रत्येक 2.5 किलोमीटरला 1 मीटर डहाळ (म्हणजेच सरकारी भाषेत 2500 मीटरला 1 मीटर प्रमाणे उतार) देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात 1 किलोमीटरला 1 मीटर इतका तीव्र उतार देण्यात आला आहे.
परिणामी कालवा इतका खोल आहे की, योजनेच्या एकूण रकमेपैकी एक चतुर्थांश इतकी प्रचंड मोठी रक्कम खर्ची केवळ खोलीकरण आणि अस्तरीकरण म्हणजेच लाईनिंग या कामांसाठी पडली आहे. शिवाय आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावाच्या परिसरात आणखी किमान 4 मीटरवरच्या परिघाला पाणी देता आले असते. परंतु त्याचा विचारच योजनेचा आराखडा करताना केला गेलेला नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने यांची दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांंकडून होत आहे.
तातडीने उपाय गरजेचे
सध्या कालव्यावरील दरड कोसळून आत पडत आहे. ऊन, वारा , पाऊस यामुळे एकसंघ असणारे दगड दिवसेंदिवस सुटे होत आहेत. याबाबत कालव्याच्या अस्तरीकरणाच्या वर तातडीने गनायटींग म्हणजेच सिमेंट आणि वाळूचा प्रेशर देऊन गिलावा न केल्यास येत्या एक दोन वर्षातच कालव्यावरचा भाग ढासळून आत पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील कालव्याचे नुकसान होणार आहे .

भिकवडीला टेंभूचे पाणी मिळू शकते


भिकवडीला टेंभूचे पाणी मिळू शकते

सध्या लाभक्षेत्राबाहेर असलेल्या भिकवडी (ता.खानापूर) आणि परिसराला टेंभूचे पाणी मिळण्यासाठी माहूली टप्पा क्र.3 अ मधून पाणी देता येवू शकते, असे अभ्यासांती मत खानापूर तालुका टेंभू योजना कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथक यांनी व्यक्त केले आहे.
टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यातून अनेक गावे लाभक्षेत्रा च्या बाहेर राहिली आहेत. या गावांना टेंभू पाणी कसे देता येईल, याबाबत सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, शासनाचे आधिकारी आणि विविध स्तरांवर चर्चा, माहिती आणि अभ्यास अशा पातळ्यांव्दारे तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.  त्यात खानापूर तालुका कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथक आपल्या परीने योगदान देत विविध पर्याय सुचवित आहेत. सध्याच्या नियोजनानुसार टेंभूचे पाणी भिकवडी या गावाला मिळत नाही.त्यावर उपाय म्हणून दोन प्रकारे पर्याय सुचवण्यात आले आहेत.
टेंभू योजनेच्या माहूली पंपगृहाच्या बरोब्बर ईशान्य दिशेला भिकवडी हे गाव आहे. या गावाचा आणि परिसराचा तब्बल 1 हजार 457 .86 हेक्टर म्हणजे 3 हजार 600 एकर इतका भाग या योजनेपासून वंचित राहिलेला आहे. या भागाला टेंभूचे पाणी मिळण्या साठी नेमके काय करता येईल? याबाबत खानापूर तालुका टेंभू योजना कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथकाने जी.पी.एस. यंत्र आणि टोपोशिटस् घेवून प्रत्यक्ष त्या भागात फि रून पाहणी केली.   यांत कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.बाबासाहेब मुळीक, जिल्हा परिषद सदस्य किसनराव जानकर, बारमाही पथकाचे कार्याध्यक्ष, निवृत्त अभियंता डी.डी.पवार आणि संभाजी मोरे यांचा समावेश होता.
त्यांनी मांडलेल्या पर्यायानुसार माहूली पंपगृहातून पाणी उचलून टप्पा क्रमांक 3 अ चा घाणंद एक्स्प्रेस कालवा जिथे सुरू होतोे तिथून भिकवडी गावच्या पूर्वेला असणार्‍या पळस पाझर तलावात नैसर्गिक उताराने पाणी जावू शकते. माहूली पंपागृहाच्या पुढे वलखड गावाजवळ घाणंद कालवा सुरू होतो तिथे कालव्याची समुद्र सपाटी पासूनची उंची 740 मीटर इतकी आहे तर पळस पाझर तलावाची उंची 735 मीटर आहे. हे अंतर जास्तीत जास्त 5 ते 6 किलोमीटर इतके आहे. त्यामुळे या कालव्याच्या तोंडालाच विमोचक (गेट) करून बंदिस्त पाईपलाईन व्दारे अगर उघड्या कालव्यातून पाणी भिकवडी हद्दीतील तलावात तब्बल 5 मीटर उताराने आरामात जावू शकते.
तसेच त्या ठिकाणी इतका मोठा उतार येत असल्याने बंद पाईप लाईन अगर कालवा जादा खोल (डिप कट) करण्याचीही गरज नाही. शिवाय जिथून हा कालवा अगर बंद पाईप जाणार आहे ती सर्व जागा वनविभागाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची आहे, त्यामुळे भू संपादन करणे, नुकसान भरपाई देणे वगैरे गोष्टींचा संबंधही उरत नाही. परिणामी भिकवडी गावच्या माथ्यावर असलेल्या पळस पाझर तलावात पाणी आल्यानंतर त्या खालील पळस ओढ्यातून पुढे पाणी संपूर्ण गाव आणि परिसराला जावू शकेल.
यांत आणखी एक पर्याय सुचविण्यात येत आहे, जर उघडा कालवा अगर बंद पाईप यांचे अंतर कमी करायचे असेल तर वलखड हद्दीच्या पुढे याच घाणंद कालव्याच्या किलोमीटर क्रमांक 2 ते 3 या दरम्यानच्या वळण असलेल्या ठिकाणी एक विमोचक करून पाणी पुढे पळस ओढ्यात सोडता येवू शकते. हे पाणीही नैसर्गिक उताराने जावू शकते. घाणंद कालवा ते पळस ओढा हे अंतर केवळ एक ते दीड किलोमीटर इतकेच आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यायाबाबत शासनाच्या अधिकार्‍यांनी तातडीने सर्व्हेक्षण करून सकारात्मक विचार केल्यास आज पर्यंत लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेले भिकवडी हे गाव टेंभूच्या कार्यक्षेत्रात येवू शकेल.