लोकसत्ता लाऊड स्पीकरसाठी …
विषय : दुष्काळ -निसर्ग निर्मित कि मानव निर्मित ?
दिनांक - १७ एप्रिल २०१३, (बुधवार )
* काही प्रश्न्न श्री माधवराव चितळे यांच्यासाठी ….
टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प , १९९६ मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प आज १६ वर्ष रखडला आहे. ७०० कोटींचा हा प्रकल्प आज ४ हजार कोटींच्यावर पोहोचलाय. आतापर्यंत १४८९ कोटी रुपये खर्च झालेत आणि केवळ २७५ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आतापर्यंत चार विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका या योजनेच्या नावाखाली लढवल्या आणि जिंकल्या गेल्यात. या भागात आलेला महाराष्ट्रातला प्रत्येक बडा नेता किंवा मंत्री टेंभू चे नाव घेतल्याशिवाय आपले भाषण पूर्ण करत नाही. सत्ताधारी, विरोधक, डावे- उजवे सगळेच पक्ष टेंभू च्या नावावर मते मागतात, परंतू ज्या आटपाडी, खानापूर, जत या दुष्काळी तालुक्यांसाठी हा तयार करण्यात आला. ते तालुके अद्यापही कोरडेच आहेत. शेवटी काय होणार या प्रकल्पाचे ? हा पूर्ण होणार का ? झालाच तर कधी होणार ? अखेर काय चाललेय टेंभू च्या नावावर ?..
चितळे साहेबांना एक सवाल असा आहे कि हि टेंभू उपसा जल सिंचन योजना खरेच व्यवहार्य आहे का ? आपण १९९९ साली या योजनेची कामे बघायला आला होतात त्यावेळी म्हणजे १४ वर्षांपूर्वी या योजनेचे जवळपास सगळे पंप्स (एकूण ६५) एका कंपनीला ऑर्डर देवून शासनाने विकत घेतले होते. त्यातले आज अखेरीस केवळ ६ पंपच सुरु अवस्थेत आहेत आणि पाणी केवळ कडेगाव तालुक्यापुरते मिळत आहे. माहुली पंप गृहाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही वीजचा पत्ता नाही अशा अवस्थेत मागे आपण (पक्षी : श्री चितळे साहेब) म्हणाला होतात कि एकदम इतके पंप इतक्यातच विकत घ्यायची गरज नव्हती. तसेच जे कालवे खोदले जातायत ते योग्य पद्धतीने काढणे सुरु नाही त्यात सुधारणा केली पहिजे.एक -एक टप्पे करून पाणी पुढे नेता येईल अशी कामे केली पहिजेत. परंतू शासनाच्या अधिकाऱ्यांनी तुमचे काही एक न ऐकता १० वर्षांपूर्वी आटपाडी , सांगोला तालुक्यात केवळ कालवे काढले आज ते ८० टक्के कालवे मुजलेल्या अवस्थेत आहेत. आता परत खोदावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या भ्रष्टाचाराबाबतच्या समितीचे आपण प्रमुख आहात. या टेंभू योजनेत काही गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार झालेला आपणास आढळला आहे का ? या योजनेचे नियोजन चुकले आहे असे आपणास वाटत नाही का ? ज्या आटपाडी आणि सांगोला तालुक्यात टेंभू चे पाणी उताराने येवू शकते त्या साठी पाणी तीन वेळा उचलून आणण्याची टेंभू योजना आखण्याची काय आवश्यकता होती ? असे आज मागे वळून पाहताना आपणास वाटते का ? कारण टेंभू योजना हि आज केवळ काही राजकारणी, कंत्राटदार आणि अधिकार्याच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. निधी मागायचा, त्यासाठी पाहिजे तर घाऊक आंदोलने करायला लावायची आणि एकदा निधी मिळाला कि आपसात गोलमाल करायचा. एकदा आखलेली योजना जर चुकीच्या निष्कर्षावर आधारित असेल आणि त्यातून लोकांचा फायदा होणार नसेल तर केवळ कुणाच्या तरी हट्टासाठी टेंभू योजनेचे वाटोळे होऊ नये असे वाटते. टेंभू चे पाणी उताराने आटपाडी आणि सांगोला तालुक्यात येवू शकते हि काही कवी कल्पना नाही. खरेच जर टोपोशिट्स, गूगल अर्थचा... वापर करून आणि प्रत्यक्ष साईट सीइंग करून हे लक्षात येत असेल तर अन्य पर्यायाकडे राज्य शासनाने गंभीरपणे पाहायला पाहिजे असे आपल्याला वाटत नाही का ? या बाबत आपली मते आपण आज लोकसत्ता लाऊड स्पीकर च्या व्यासपीठावरून द्यावीत हि नम्र अपेक्षा ।
आपला ,
विजय लाळे ,
पत्रकार दैनिक पुढारी,
विटा, जि. सांगली
मोबा. 8805008957