लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday 2 August 2021

कृष्णेच्या महापूरावर कृष्णा -माणगंगा नदी जोड प्रकल्प जालीम उपाय ठरेल !

  

कृष्णेच्या महापूरावर कृष्णा -माणगंगा नदी जोड प्रकल्प जालीम उपाय ठरेल !
विटा : विजय लाळे
सातारा,सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोटातील महापूरावर कृष्णा -माणगंगा नदी जोड प्रकल्प जालीम उपाय ठरु शकतो.
  महाबळेश्वरच्या डोंगर रांगांत दरवर्षी सरासरी ६ हजार ५०० मि.मी. पाऊस पडतो. त्यामुळे अनेक वेळा कृष्णेला महापूर येतो. त्या पुराचा फटका सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णाकाठच्या अनेक गावांना बसतो. मात्र त्याच वेळी माणगंगा, येरळा आणि अग्रणी नद्यांच्या खो-यात दुष्काळी परिस्थिती असते. केवळ पावसाळ्याच्या काळातील, म्हणजे ३० जून ते १५ सप्टेंबरपर्यंतचे पाणी जरी दरवर्षी मिळाले तरी तो भाग सुफलाम होईल. कृष्णा लवादाच्या वाटपाव्यतिरिक्त पावसाळ्यातील ४.५२ टी.एम.सी. पाणी कृष्णा नदीत उपलब्ध आहे. त्या शिवाय कोयना धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ वळण बंधारा बांधून ते पाणी धोम धरणात आणि तेथून उताराने थेट दुष्काळी भागाकडे आणण्‍यात येणार आहे. याबाबत बारमाही माणगंगा अभ्यास पथकाने २००६ ते २००८ या कालावधीत अनेक गुगल मॅप्स, सॅटॅलाइट इमेज री आणि टोपोशिट्स तसेच प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सर्वेक्षण करून नोंदी घेऊन एक प्रकल्प आराखडा तयार केला.या अभ्यास पथकामध्ये मध्ये पाटबंधारे ची निवृत्त अभियंता डी.डी.पवार,कै.पी.ए.पाटील, आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्याचे तत्कालीन कार्य कारी संचालक एच.एस.पाटील, सांगोला (सोलापूर) येथील प्राध्यापक अमोल पवार आणि पत्रकार विजय लाळे यांचा सहभाग आहे.त्यानंतर या पथकाने सविस्तर प्रस्ताव तयार करून सांगली आणि सातारा जलसंपदा विभागाकडे दिला. त्यावर राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सातारा आणि सांगली या दोन्ही विभागांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुन्हा शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत सर्वेक्षण केले आणि या प्रकल्पाच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब केले.
*असा हा प्रकल्प आराखडा*
कोयना धरणाच्‍या पाणलोटातील सोळशी नदी वर धनगरवाडी गावाजवळ एक वळण बंधारा बांधून ८.७६ किलोमीटर लांबीचा पहिला बोगदा प्रस्तावित आहे. या बोगद्यातून धोम धरणाकडे (कृष्णा नदीवरच्या या धरणाची साठवण क्षमता १४ टी.एम.सी.आहे) चौर्‍याण्णव घनमीटर प्रती सेकंद विसर्गाने ३.५० टी.एम.सी. पाणी येईल. या धरणाची पूर्ण संचय पातळी ७४७.७० मीटर आहे. यातून १९७९-१९८० ते २००७-०८२००९-१० आणि २००१५ ते २०२१ पर्यंतच्‍या कालावधीत प्रत्‍यक्ष सांडव्‍यातून पाण्‍याचा विसर्ग लक्षात घेता सरासरी ४.५२ टी.एम. सी. पाणी योजना बाहेरचे उपलब्ध आहे. असे दोन्ही मिळून या प्रकल्पासाठी एकूण ८.०२ टी.एम.सी. पाणी उपलब्ध आहे.
सोळशी ते धोम धरणाच्या डाव्या काठापासून (उत्तरेकडून) ते दबई नाला (तालुका आटपाडी, जिल्हा सांगली) या दरम्यान ११७ किलोमीटर लांबीचा दुसरा मुख्य बोगदा काढण्‍यात येणार आहे. त्‍या बोगद्याला धोमपासून ७६ कि.मी.वर दरुज-वाकेश्वरजवळ पूर्वोत्तर दिशेला १५ कि.मी.वर असणा-या पिंगळी नदीला जोडणारा आणखी एक उपबोगदा काढण्‍यात येणार आहे. ही पिंगळी नदी गोंदावले बुद्रुकजवळ माणगंगे ला मिळते. ते अंतर साधारणत: ४.५० कि.मी. इतके आहे. त्यामुळे गोंदावले बुद्रुकपासून माणगंगेवरील सर्व मध्यम, लघू पाटबंधारे, तलाव आणि कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे यांना पाणी मिळेल.तसेच दुसऱ्या बाजूला धोमकडून येणाऱ्या या मुख्‍य बोगद्यातून दबई नाल्‍यात येईल आणि या जवळच्‍या जांभुळणी नाल्‍यातून पुढे ४ किलोमीटरवर घाणंद संतुलन तलावात येईल. तेथून पुढे टेंभू योजनेच्या अस्तित्वात असलेल्या सर्व वितरण प्रणालीचा (म्हणजेच कालव्‍यांचा) वापर करून पाणी सर्वत्र देता येईल. दुसरीकडे जांभुळणी तलावातून बाहेर पडलेले पाणी थेट आटपाडी तलावात जाईल. हा तलाव भरल्यानंतर पुढे शुक ओढ्यामार्गे आटपाडी शहराच्या पूर्वेस माणगंगा नदीला जाईल. तर पिंगळी नदीतून राजेवाडी तलावामार्गे आटपाडी तालुक्याच्या उत्तर भागातून फिरून एकत्रितपणे आलेले पाणी माणगंगेतून सोलापूर जिल्ह्याकडे जाईल.
दरम्यान,घाणंद तलावापासून निघालेला टेंभूचा कालवा (सांगोला शाखा) नेलकरंजी, मानेवाडी, हिवतड या मार्गे सांगोल्याकडे जात असताना चिंचाळे, खरसुंडी, कानकात्रेवाडी, माळेवस्ती, तळेवाडी या गावांतील ओढ्यातून त्या खालच्‍या करगणी, पात्रेवाडी, बनपुरी, कचरेवस्ती, शेटफळे आदी गावांना आणि परिसरातील सर्व लहानमोठ्या तलावांना पाणी मिळेल आणि ते सर्व पाणी टेंभू योजनेच्या या शाखेला कवठेमहांकाळकडे जाणा-या बाणुरगड बोगद्यातून उताराने जाऊन सर्व ओढे, नाले व त्यावरील बंधारे, तलाव आपोआप भरतील. तसेच, ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवण योजना आहेत त्या पूर्ण क्षमतेने भरून उर्वरित पाणी खालच्‍या बाजूस माणगंगा नदीला मिळणार आहे.
येरळा ही कृष्णेची उपनदी असली तरी मुळात माणदेशातील आहे. या नदीच्‍या एकूण १०० कि.मी. लांबीपैकी या प्रकल्पातून वडूज ते ब्रम्हनाळ अशा ६८ कि.मी.च्‍या पात्राला थेट पाणी देता येईल. धोम मधूनच्या ११७ कि.मी. लांबीच्या मुख्य बोगद्याला ८५ कि.मी.वर फक्त १०० मीटर लांबीचा आणखी एक पोटबोगदा काढून वडूजजवळ लेंडूर ओढ्याजवळ पाणी येरळवाडी तलावात सोडले तर ते पुढे येरळेला जाते. त्यामुळे या नदीलाही मिळेल.या बरोबरच
अग्रणी या कृष्णेच्या आणखी एका उपनदीला ही प्रकल्पाव्दारे प्रवाहित करता येते. अग्रणी नदीची लांबी ७५ कि.मी.इतकी आहे.ही नदी भूड (ता. खानापूर, जि.सांगली ) गावाजवळील भिवघाटापासून उत्तरेला डोंगरात उगम पावते. धोममधून आणलेले पाणी जांभुळणी तलावातून टेंभू योजनेच्या, सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कालव्यांव्दारे पुढे नेलकरंजी (ता.आटपाडी) फाट्यापासून ५ कि.मी.चा बोगदा काढून वायफळेच्‍या अलिकडे यमगर वाडी रस्त्याजवळ (ता. तासगाव) अग्रणीला पाणी देता येईल. या ठिकाणी पाणी ४ मीटरच्‍या नैसर्गिक उताराने नेलकरंजीहून बोगद्याद्वारे अग्रणीला मिळेल. ही नदी तासगाव, कवठे महांकाळच्या पुढे कर्नाटकातील खिळेवाडी (जि. बेळगाव) च्या पलीकडे जाऊन कृष्णेला मिळते. अशा रीतीने माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना पाणी मिळणार आहे.
* प्रकल्पाची वैशिष्‍ट्ये-
* माणगंगा,पिंगळी, येरळा आणि अग्रणी अशा चार नद्या जोडण्यात येणार.
* भारतातील नंबर दोनच्या व महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या अति-अति तुटीच्या भागाला हक्काचे पाणी मिळणार
* पाणी लिफ्ट करण्या ऐवजी नैसर्गिक उताराने येणार असल्यामुळे विजेचा प्रश्न नाही.
* बोगद्याच्‍या १०० फूट उतारामुळे किमान ७ ते ८ मेगावॅट वीज निर्मिती शक्‍य.
* सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कायमस्वरूपी दहा दुष्काळी तालुक्यांतील शेकडो गावांचा आणि खेड्यापाड्यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटून टँकर्स, चारा छावण्यांसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. दुसरीकडे वाई शहरापासून पुढे सर्व कृष्णाकाठच्‍या गावांना महापूराचा धोका उरणार नाही.
* प्रकल्पासाठी फक्त बोगद्या किंवा आवश्यक तिथे कालव्यांसाठी लागणारी जमीन शासनाला संपादित करावी लागणार. यातील बहुतांश जमीन शासकीय आहे. त्यामुळे गाव उठवणे किंवा पुर्नवसन करणे हे प्रश्न निर्माण होणार नाहीत.
*माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांच्या काठावरील एकूण साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.
* या भागातील झाडे-झुडपे वाढून वातावरणातील आर्द्रता वाढून भविष्यातील तापमानवाढीचा धोका टळेल.
* दरवर्षी पाणी वाहिल्यामुळे तिन्ही नदीकाठ च्या विहिरी जिवंत होतील, तसेच नैसर्गिक रीत्या भूगर्भपातळी वाढेल.
*माणगंगा नदी सरकोली जवळ (ता. पंढरपूर) भीमेला मिळते. तेथून पुढे औज आणि टाकळी बंधार्‍यांत पाणीसाठा वाढल्‍याने सोलापूर शहराचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल.
*चौकट*
  कृष्णा-माणगंगा नदीजोड प्रकल्प राज्‍य शासनाच्‍या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ - पुणे यांच्‍या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, आरफळ कालवे विभाग, करवडी(कराड) यांनी तयार करून  सकारात्म क शिफारशींसह जलसंपदा विभागाकडे
पाठवला आहे. त्यास शासनाच्‍या अनेक उच्चस्तरीय अधिका-यांकडून  प्रतिसाद मिळाला आहे.

*चौकट*
कृष्णा माणगंगा नदी जोड प्रकल्पा अंतर्गत ज्या तालुक्यांना कृष्णेच्या पाण्याचा लाभ होणार आहे ते १० तालुके :-
*सांगली जिल्हा* -कडेगाव,खानापूर,आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव.
*सातारा जिल्हा*- माण-म्हसवड,खटाव,
*सोलापूर जिल्हा*- सांगोला आणि मंगळवेढा.